स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात आरक्षण व कायद्याचे संरक्षण नसताना रामजी भांगरे, राघोजी भांगरे, रामा किरवा, राया ठाकर, सत्तू मराडे, होनाजी केंगले, ढवळा भांगरे, रुक्मिणी खाडे या व अशा अनेक आदिवासी क्रान्तिवीरांनी आपली संस्कृती, जमीन, जल, जंगल व अस्मिता जपण्यासाठी मोठा लढा दिला. राघोजी भांगरे यांच्या लढ्याचे फलित म्हणून आज सह्याद्री भागात आदिवासींकडे आहे, अन्यथा ती तेव्हाच सावकारांकडून मोगलांच्या ताब्यात गेली होती. म्हणजे आदिवासींच्या आजच्या मालकीची जमीन हि राघोजी भांगरे यांच्या बालिदानातून मिळालेली आहे. यासाठी कोणता देव आदिवासींना पावला नाही की स्वातंत्र्याने तुमच्या पदरात काही टाकले नाही. उलट स्वातंत्र्यानंतर जी इंग्रजांनी जमीन बळकावलेली होती व ज्याला वनजमीन म्हणून घोषित केली होती, स्वातंत्र्यानंतर ती जमीन आदिवासींना परत देने आवश्यक होते...पण असे झाले नाही. म्हणजेच स्वातंत्र्य कोणाला मिळाले हा विचार आदिवासींना करावा लागणार आहे.
स्वातंत्र्यापूर्वी ओतूर, जुन्नर परिसर असेल किंवा शेणीत, राजूर, मुरबाडचा परिसर असेल, या भागात मोठ मोठे जंगल सत्याग्रह केले गेले. आदिवासींचे जंगल तोडून ब्रिटिश सरकारने संपूर्ण आशियात रेल्वेचे रूळ बसविण्याचे काम सुरु केले होते. याला प्रखर विरोध सह्याद्री भागात आदिवासींनी केला. शिवनेरी किल्ला जिंकून घेणा-या खेमा नाईक या आदिवासी लढवय्या विराच्या क्रान्तिची मशाल जर या आदिवासी बांधवांत पोहचली तर आपली सत्ता ते सहज ताब्यात घेऊ शकतात, या भीतीतून मोगलांनी मोठ्या संख्येने आधुनिक शस्त्रास्त्रे वापरून शिवनेरी पुन्हा जिंकून घेण्यात आला. या भागातील आदिवासींवर वचक निर्माण व्हावा म्हणून शिवनेरी किल्ल्यावर खेमा नाईकसह 1500 महादेव कोळ्यांची कत्तल करण्यात आली. रक्ताचे पाट वाहिलेत शिवनेरीच्या बालिदानात...येथील प्रत्येक दगड आणि बुरुज आदिवासींच्या बलिदानाची साक्ष देत दिमाखाने उभा आहे. या किल्ल्यावरील महादेव कोळी चौथरा याची आपणास साक्ष देत आहे. याच बलिदानाच्या प्रेरणेतून आज अनेक तरुण आदिवासी विचार मंचच्या माध्यमातून या भागात गावागावात जाऊन हा इतिहास लोकांना सांगत आहेत. काय आपले आणि काय परके याची जाणीव करून देत आहेत. याच विचारधारेतून घोडेगाव येथील हा आक्रोश मोर्चा राजकीय लोकांच्या नेतृत्वाशीवाय आयोजित केला होता.
पुणे, नाशिक, मुंबई, आंबेगाव, खेड, मावळ, मंचर, जुन्नर, ओतूर, अकोले, इगतपुरी, जव्हार, नगर, मुरबाड अशा विविध भागातून आपला निषेध नोंदविण्यासाठी हजारो आदिवासी समाजबांधव जमा झाले होते. प्रत्येकाच्या मनात या व्यवस्थेविरुद्ध राग होता. तो स्पष्ट दिसत होता. खासकरून विद्यार्थी संघटना आपल्या मागण्या व आपल्या बहिनींवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी उपस्थित होते.
सुमारे 2.5 ते 3 किमी अंतरावरून प्रकल्प व तहसील कार्यालयाकडे मोर्चा जाऊ लागला. एरवी बाजारात गर्दी करणारे आदिवासी समाज बांधव आज मात्र सर्वकाही विसरून ..…आपल्या हातातला इळा कोयता खाली ठेऊन आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. राजकीय लोकांच्या मोर्चाना कशी गर्दी जमवली जाते हे सर्वांना ठाऊक आहे, परंतु इथे सर्व समाज मनाने व आदिवासी भावनेने एकत्र आलेले सर्वजण होते. अगदी शिस्तीत मोर्चा पुढे जात होता. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक महिला व मुली त्वेषात घोषणा देऊन आता आम्ही लढायला सज्ज झालो आहोत असाच संदेश या व्यवस्थेला देत होत्या.
प्रकल्प कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. गेटचे दार जे इतर दिवशी सताड उघडे असते, ते आज आमच्यासाठी बंद केले होते. ज्या सरकारला आम्ही आमची जमीन दिली, जंगल दिले...., आज ते आम्हाला आमच्याच कार्यालयात येऊन देण्यास मज्जाव करत आहेत. याचा निषेध सर्वप्रथम करण्यात आला.
ढवळा ढेंगळे यांनी मोर्चाचे आयोजन व दिशा याबाबत आपले विचार प्रास्ताविकातून मांडले. अतिशय चित्कार व आक्रोश व्यक्त करत आश्रमशाळेत किंवा इतर ठिकाणि नेमके काय सुरु आहे यावर प्रखर टीका करत आपल्याला आता लढावे लावेल हि भावना त्यांनी व्यक्त केली.
ठाकर, कातकरी, भिल्ल, महादेव कोळी, कोकणा अशा विविध भागांतील आदिवासी जमातींमधील प्रतिनिधींना आपले विचार मांडण्याची संधी दिली.
निवेदन कार्यालयात जाऊन न देता त्यांनी इथे मोर्चात येऊन स्वीकारावे असा आग्रह केल्यानंतर तहसील कार्यालयातुन नायब तहसीलदार व प्रकल्प कार्यालयातून सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांना पाठविण्यात आले . मोर्चातील सर्वांनी त्यांचे मुख्य अधिकारी का आले नाहीत याबाबत धारेवर धरले.
जी व्यवस्था समाजासाठी काम करते. त्या व्यवस्थेतील अधिकारी आदिवासी आक्रोश मोर्चा असूनसुद्धा उपस्थित राहत नाहीत. यातून हि व्यवस्था आदिवासींकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघते हे आपण समजून घेतले पाहिजे. निवेदन मुलींच्याद्वारे त्यांना देण्यात आले व आरोपींना फाशीच झाली पाहिजे याची आग्रही मागणी करण्यात आली.
अतिशय शिस्तबद्ध वाहतुकीला व प्रशासनाला कोणताही त्रास न देता आदिवासी आक्रोश मोर्चा समाप्त झाला तो पुढील लढाईसाठी.....!
- भलर
मी आदिवासी गर्व आदिवासी
0 comments:
Post a Comment