भलर- दुसरा अंक (नोव्हेंबर २०१६)

 

आदिवासी वीरांगना राणी दुर्गावती जयंती

 

पुणे, पिंपरी चिंचवड विभाग

रविवार, 2 ऑक्टोबर 2016 

 

आदिवासी वीरांगना राणी दुर्गावती यांचा जन्म प्रसिद्ध राजपूत राजा,  चंडेल सम्राट किरतराय यांच्या कुटुंबात 5 ऑक्टोबर 1524 रोजी झाला. 

जन्मस्थान कालांजर किल्ला, जिल्हा बांदा, उत्तर प्रदेश

विवाह : 1542 साली गोंड राजघराण्यातील राजा संग्रामशाह यांचे सुपुत्र दलपतशाह यांच्याशी झाला. 

राणीच्या साम्राज्यातील प्रदेश अतिशय समृद्ध होता. राणीने आपले साम्राज्य वाचविण्यासाठी असफ खानाशी जोरदार संघर्ष केला. एका बाजूला अकबराचे अफाट सैन्य आणि दुस-या बाजूला राणीचे अप्रशिक्षित सैन्य. पहिल्या प्रयत्नात राणीने आघाडी घेतली आणि पळणा-या मुघल सैन्याचा धुव्वा उडवला.
मोगल सैन्याच्या अवाढव्य सैन्याच्या पलटवाराला तोंड देणे अशक्य आहे असे वाटत असताना मोगलांच्या हातात पडण्यापेक्षा राणी दुर्गावतीने 24 जून 1564 रोजी स्वताचे जीवन संपविले. 

भारताच्या इतिहासात तो शहीद दिवस म्हणून लिहिला गेला.

आजचा युवक आपल्या इतिहासाच्या सन्मानासाठी आता जाहीरपणे पुढे येऊ लागला आहे. आज पुण्यातील आदिवासी महिलांनी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पाडला.



कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
● भव्य अशी मिरवणूक
● आदिवासी नृत्य व संगीताने सर्वांच्याच उत्साहाला उधाण
● महापौर, नगरसेवक व अनेक सामाजिक कार्यकर्त्या महिलांची उपस्थिती
● पुणे व परिसरातील विद्यार्थिनींचा मोठा सहभाग
● महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून कार्यकर्त्या महिलांची उपस्थिती
● भावना ईलपाची यांच्या प्रभावी विचारांनी क्रान्तिची लहर
● रंजना पावरा यांच्या शब्दांनी स्त्री शक्तीचे दर्शन
● ममताताई भांगरे, देवगाव, अकोले तालुका यांचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल यथोचित सन्मान
● अनेक तळमळीचे काम करणा-या भगिणींचा सत्कार
● आदिवासी इतिहास, आरक्षण, ऍट्रॉसिटी, जातीभेद, स्त्री भ्रूण हत्या, शिक्षण अशा विविध विषयांवर मौलिक विचार विमर्श
● आदिवासी नृत्य व इतर कलाविष्कार
● उत्कृष्ट नियोजन व सुसूत्रता



#भलर


--------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------


जायबाची चरित्र-कहाणी हाच खरं तर जव्हारचा इतिहास


                     ठाणे जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये नव्या राजवाड्याची प्रशस्त वास्तू सोडली तर ब्रिटिश राजवटीतलं हे छोटंसं संस्थान होतं, हेसुद्धा कुणाच्या ध्यानी येणार नाही. मग शिवशाहीपूर्वीच इथं स्वराज्याचा प्रयत्न झाला होता, हे कळणं तर दूरच. नवा राजवाडासुद्धा तसा गावाबाहेर. दूर. जुना राजवाडा म्हणून आता सरकारजमा झालेली जी वास्तू दाखवली जाते, ती अत्यंत साधी, गावच्या देशमुखाची गढी वाटावी अशी. फारसा बडेजाव, दिमाख न दाखवणारी. जव्हार संस्थानाची ही खासियतच म्हणावी लागेल. संस्थानाचा संस्थापकच होता मुळी महादेव कोळी समाजाचा- म्हणजे आदिवासी. जव्हार संस्थानाच्या राजघराण्याचा मूळपुरुष देवराम मुकणे. देवराम मुकणे हेच ‘जायबा‘ या नावानं प्रसिद्धी पावले अन्‌ त्यांनी स्वतःच्या पराक्रमावर स्वतंत्र राज्य स्थापलं, आपल्या घराण्याची स्वतंत्र गादी निर्माण केली. ब्रिटिशकाळात त्या राज्याला संस्थानाचा दर्जा मिळाला. वसईच्या पोर्तुगीजांना, मराठ्यांना तसंच ब्रिटिशांनाही मुकणे घराण्याच्या वंशजांना, जव्हारच्या मुकणे कुटुंबीयांना संस्थानाधिपतींचा मान द्यावा लागला. त्याला प्रामुख्यानं जायबा मुकणे यांचा पराक्रम कामी आला, यात शंका नाही. जवळजवळ सहाशे वर्षं स्वतंत्र कारभार राहिलेल्या या भागाचा इतिहास गौरवशाली असाच आहे. तरीही आजच्या जव्हारमध्ये भूतपूर्व संस्थानाच्या फारशा खुणा आढळत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं.

महादेव कोळी समाजात जन्मलेल्या अन्‌ स्वकर्तृत्वावर राजेपण मिळवणार्‍या जायबांच्या पराक्रमाबद्दल त्यांच्या वंशातले अठराव्या पिढीचे वारसदार असलेल्या यशवंतराव महाराजांनी कादंबरीरूपात आपल्या घराण्याच्या मूळ पुरुषासंबंधानं लिहून ठेवलं नसतं, तर आपल्या इतिहासातलं एक गौरवशाली पृष्ठ कालौघात गहाळ झालं असतं. यशवंतराव महाराजांनी अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांची वानवा ओळखून वडिलोपार्जित सांगितल्या जाणार्‍या इतिहासाला उपलब्ध अस्सल कागदपत्रांची जोड देऊन जी कादंबरी लिहिली, ती वाचल्यानंतर या आदिवासी राजघराण्याच्या मूळपुरुषाची कर्तबगारी तर ध्यानात येते. किंबहुना लेखकानं आपल्या घराण्याच्या सदस्यांवर अन्‌ प्रजेवर अनंत उपकार करून ठेवले आहेत असंच म्हणावं लागेल. ‘जायबा‘ ही चरित्र-कहाणी (संस्थानासाठी एडिंबरा, ब्रिटनच्या टी. अँड ए. कॉन्स्टेबल लिमिटेड या कंपनीनं छापलेली, १९७०) उत्कंठावर्धक आहेच, शिवाय राजघराण्यातल्या व्यक्तीनंच ती लिहिली असल्यानं या राजघराण्यातल्या कुटुंबीयांच्या सुखदुःखांशी समरस होता येतं. तसंच या अनोख्या राजघराण्याच्या रीतिरिवाजांची जानपहचानही होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सव्वाशे वर्षं पूर्वी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या जायबा मुकणे यांची जीवनगाथा अन्यथा प्रकाशात कधीच आली नसती. राजा जयदेवराव ऊर्फ जायबांनी १३०६ मध्ये जव्हार किल्ला आपल्या साथीदारांच्या साह्यानं जिंकला. त्यापाठोपाठ त्यांनी आसपासचे एकवीस लहान-मोठे किल्ले जिंकले. पाच हजार चौरस मैलांच्या टापूवर त्यांनी हुकूमत मिळवली. कोणत्याही अन्य सत्तेची त्यांनी बांधिलकी मानली नाही. मग ते देवगिरीचे यादव असोत वा दिल्लीकर मोगल असोत. एवढं होऊनही त्यांच्या राजसत्तेला दिल्लीकरांनी त्यांच्या हयातीत मान्यता दिली नाही. जायबांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव धुलबाराव गादीवर बसल्यानंतर दिल्लीकर मोगलांना जव्हारला स्वतंत्र राज्याची मान्यता द्यावी लागली. ६ जून १३४२ रोजी जव्हारला अभिषिक्त राजा मिळाला. जव्हार राज्याची हद्द थेट वसई बंदरापर्यंत होती. त्यामुळे जव्हारचे पोर्तुगीजांशी संबंध प्रस्थापित झाले. जव्हारच्या राजाचा पोर्तुगीजांवरही धाक होता. सुरतेच्या मोहिमेवर गेलेले शिवाजी महाराज जव्हारमार्गेच तिथं गेल्याचा उल्लेखही सापडतो. शिवाजी महाराजांना जव्हारनं सैन्याची कुमकही दिली होती. मोगलांशी झालेल्या संघर्षात शिवाजी महाराजांच्या पारड्यात जव्हारनं आपली प्रतिष्ठा टाकली होती. वसईच्या मोहिमेवर निघालेल्या चिमाजीअप्पाला जव्हारच्या राजानं आपलं सैन्य पाठवून मदत केली असल्याचे दाखलेही मिळतात. सुरुवातीला जंगलपट्टीत पसरलेल्या जव्हार राज्याची उत्तर सीमा धरमपूर संस्थानापर्यंत जाऊन भिडली होती.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र पेशव्यांनी जव्हारच्या राजाला अंकित केलं. खंडणी वसूल करण्यास सुरुवात केली. जव्हार राज्यातल्या उत्तम जमिनी पेशव्यांनी मिळवल्या. पेशव्यांकडून या भागाची सत्ता मिळवणार्‍या इंग्रजांनी १८२६ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी तह केला. माऊंटस्ट्युअर्ट एल्फिन्स्टन या मुंबईच्या पहिल्या गव्हर्नरला १८२३ मध्ये उत्तर कोकणचा कलेक्टर सॅविल मॅरिअट अन्‌ ठाण्याचा डेप्युटी कलेक्टर व मॅजिस्ट्रेट आर. एच. शोवेल यांनी जव्हारबद्दल रिपोर्ट पाठवला, तो गव्हर्नरनं तंतोतंत स्वीकारला. जव्हार तेव्हापासून संस्थान बनलं. हा अहवाल अवघ्या वीसएक पानांचा आहे, तरी त्यात जव्हारच्या अधिकृत इतिहासाची झलक मिळते. (रफ नोट्‌स कनेक्टेड विथ द पेटी स्टेट ऑफ जव्हार इन द ठाणा डिस्ट्रिक्ट) त्यात सुरुवातीलाच असं म्हटलं आहे की, मराठी साम्राज्याची ज्या प्रकारे स्थापना झाली, त्याच प्रकारे जव्हारचं राज्य स्थापन केलं गेलं. तेही शिवाजी महाराजांच्या पूर्वी सव्वाशे वर्षं!

१३४१ पासून ते १७५८ पर्यंत जव्हारच्या अखत्यारीत जो मुलुख होता तो दमण नदी, वसई अन्‌ सह्याद्रीची पर्वतराजी. हे राज्य त्यावेळी पार भिवंडीपर्यंत पसरलं होतं. राज्याचा वार्षिक महसूल अंदाजे साडेतीन लाख रुपये होता, असं मॅरिअटनं रिपोर्टात लिहिलं आहे. अठराव्या शतकाच्या मध्यापासून जव्हार संस्थानाचे पेशव्यांशी फारसे चांगले संबंध राहिले नाहीत. पेशव्यांनी जव्हारला नमवून जव्हारच्या राजाचा प्रदेश तर बळकावलाच, पण त्याच्या राज्याचा महसूलही वार्षिक पंधरा-वीस हजारांवर जाणार नाही याची दक्षता घेतली. खरं तर इथपासूनच जव्हारच्या अधोगतीला सुरुवात झाली. दरबारातली कारस्थानं, राजाच्या निधनानंतर गादीवर हक्क सांगणारे अधिक अशा नेहमीच्या प्रकारांना ऊत आला. ब्रिटिशांनी हस्तक्षेप करण्यापूर्वी या प्रकारामुळे, कौटुंबिक कलहांमुळे शक्तिपात अन्‌ वाटणी यांनीच जव्हारला क्षिती पोहोचवली. १७९२ मध्ये जेव्हा राजे पतंगशहा निधन पावले, तेव्हा त्यांच्या तीन पुत्रांत- विक्रमशाह, यशवंतराव अन्‌ महादेवराव यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचला. त्यात चौथ्या अनौरस पुत्राची भर पडली. उत्तर कोकणचा कलेक्टर सॅव्हिल मॅरिअटनं तो सारा गुंता राणीसाहेबांशी चर्चा करून १८२२ मध्ये सोडविला. अन्‌ जव्हार मुक्कामी तुलनेनं शांतता प्रस्थापित केली. राजे पतंगशहांचा नातू प्रतापराव यांना जव्हारच्या गादीवर बसण्यास मॅरिअटनं मदत केली. जव्हार संस्थान स्वातंत्र्योत्तर काळात १० जून १९४८ मध्ये भारतीय संघराज्यात विलीन झालं.

जव्हार संस्थानचा उदयास्त इतर संस्थानपेक्षा वेगळा नाही. पराक्रमी पुरुषाच्या पोटी पराक्रमी पुत्रच जन्माला येईल याची खात्री नसते. स्वकर्तृत्वावर मोठं झालेल्यापेक्षा आयती सत्ता मिळालेला कमी कर्तबगार निघण्याचीच शक्यता अधिक. जव्हारचं वैशिष्ट्य म्हणजे हे आदिवासी राजाचं राज्य. पराक्रमी जायबानं हे राजेपद कसं मिळवलं, कसं वाढवलं, हेच या राज्याच्या इतिहासातलं गौरवशाली प्रकरण. बाकीचा इतिहास अन्य छोट्या संस्थानांसारखाच. राजे यशवंतराव मुकणे यांनी आपल्या घराण्याच्या मूळपुरुषाच्या लिहिलेल्या चरित्र-कहाणीचं महत्त्व वाटतं ते यासासाठीच. ‘जायबा‘ या चरित्र-कहाणीतले कित्येक प्रसंग रोमहर्षक वाटतात. अगदी जायबांच्या राज्य-स्थापनेच्या सुरुवातीच्या प्रयत्नापासून ते त्यांच्या प्रतिलोम विवाहावेळी घडत गेलेल्या मानापमानाच्या नाट्यमय घटनांपर्यंत कित्येक पानं कादंबरीसारखी सुरस वाटतात.

जायबांनी स्वतंत्र राज्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न करण्याची तयारी करावी, यातही काही दैवी संकेत असल्याचं दिसतं. हिंदुधर्मीयांचा मुस्लिमांकडून होणार्‍या धार्मिक छळामुळे संत्रस्त झालेले सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात राहणारे आदिवासी ‘सदानंद महाराज‘ या नाथपंथी सिद्धपुरुषाला फार मानत होते. धर्मभ्रष्टतेविरुद्ध सदानंद महाराजांनी बंड पुकारलं. जुन्नर, नगर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी इथल्या महादेव कोळी समाजाच्या मंडळींमध्ये त्यांनी जागृती आणली. इगतपुरी तालुक्यातल्या ‘मुकणी‘ गावच्या जमीनदार आदिवासींना संघटित होण्याचा अन्‌ वारली मंडळींच्या ताब्यात असलेल्या जव्हारचं राज्य घेण्याचा सल्लाही सदानंद महाराजांचाच. जायबांना झालेला दृष्टांत, सदानंद महाराजांची देवराम ऊर्फ जायबांशी अचानकपणे झालेली भेट, गुरू-शिष्यांचा खल, गुरूचा शिष्योत्तमाला आशीर्वाद अन्‌ शिष्याच्या म्हणजे जायबांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य-तोरण बांधायला निघालेला महादेव कोळी समाज... हे सारं सव्वाशे वर्षांत घडले. शिवाजी महाराजांच्या आयुष्यासारखंच. फरक फारच थोडा. शिवाजी महाराजांवर जिजाईचा होता तसा व तेवढा मातेचा प्रभाव जायबांच्या आयुष्यावर पडला नाही. जायबांचे धर्मगुरू सदानंद महाराज. ‘दादोजी कोंडदेव‘ हे त्यांचे चुलते. हे चुलतेच मातेच्या अन्‌ गुरूच्या स्थानी. चुलत्यांनीच जायबांना घडवलं. स्वराज्याबद्दलची ऊर्मी जायबाच्या हृदयात यायला त्यांचे हे चुलतेच जबाबदार होते. परकियांबद्दल घृणा अन्‌ आसमंताबद्दल प्रीती या भावना स्वदेश-प्रेमाची मुळं रुजवतात. जायबांचं तसंच झालं. चुलत्यांच्या सांगण्यावरून संकटात सापडलेल्या जमीनदाराला त्याच्या परकीय शत्रूपासून शर्थीनं वाचवण्याचं साहस जायबांनी केलं, ते चुलत्याच्याच सांगण्यावरून. उधाजीराव नावाच्या श्रीमंत जमीनदारावरचं संकट जायबानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं पळवून लावलं. उधाजीराव जायबावर खूश झाले, बक्षिसी देऊ करू लागले. उधाजीरावाची गुणरूपसंपन्न कन्या मोहना जायबाला प्रथमदर्शनीच आवडली. चुलत्यानं उधाजीरावाकडे मोहनासाठी गळ टाकली. उधाजीराव खवळला. भर मेजवानीत जायबाचा अवमान झाला. जायबा आदिवासी, उधाजीराव उच्च कुळातले. प्रतिलोम विवाहाला तयार नसलेले. अनवस्था प्रसंग गुदरला असता, पण चुलत्यानं जायबाला आवरलं. शिवाय मोहनानं जायबाच्या पराक्रमावर खूश होऊन त्याला मनानं वरलेलं. जायबालाही पराक्रम दाखवण्याची दुसरी संधी लगेच मिळाली. मेजवानीच्या वेळी प्रत्येकावर चाल करून येणार्‍या मदमस्त हत्तीला त्याच्या माहुतालासुद्धा आवरता येत नव्हतं, पण जायबानं ती कामगिरी लीलया करून दाखवली. मोहनाला पराक्रमी पुरुषाचं दर्शन प्रत्यक्ष झालं अन्‌ तिनं आपलं हृदय देऊन टाकलं. पण विवाहात अडसर परंपराप्रिय उधाजीरावाचा. मोहना अस्वस्थ, जायबा उद्विग्न.

अशा वेळी दृष्टान्त झाला- जायबाला चुलत्यानं सदानंद महाराजांच्या दर्शनाला नेलं. गर्दी भरपूर. महाराजांनी जायबाला गर्दीतच पाहिलं. त्याच्याकडे बोटे दाखवत ते म्हणाले, ‘तू, तूच जव्हारचा राजा!‘ सिद्धपुरुषाचीच ती वाणी. ती खरी ठरली. सैन्य, दारूगोळा, पैसा- यापैकी काहीही नसताना केवळ निष्ठावंत साथीदारांच्या साह्यानं जायबानं भूपतगड हा जव्हारजवळचा किल्ला घेतला. तत्पूर्वी सुरतेस जाऊन लूट केली. एका लुटीत सुभेदारानं प्रतिहल्ला केला. तेव्हा जायबांच्या बाजूच्या मंडळींत पळापळ झाली. जायबांनीही ‘कोडद‘ गावच्या भट्ट घराण्यात स्वसंरक्षणार्थ आश्रय घेऊन जीव वाचवला. या भट्ट घराण्याचे उपकार स्मरून राजेपद मिळताच जायबांनी त्या घराण्याला राजपौरोहित्याचा मान दिला. तो त्यांच्या वंशजांनी शेवटपर्यंत सांभाळला.

जायबा हे जव्हारचे राजे झाले. मोहना मोहीत झालीच होती. फक्त उधाजीरावांचा विरोध होता. जायबांचा पराक्रम त्यांनाही कौतुकाचाच विषय होता. पण प्रतिलोम विवाहाला ते राजी नव्हते. हळुहळू विरोध मावळला. मोहना अखेर राणीसाहेब बनल्या. ‘जायबा‘ चरित्र-कहाणीचं कथानक एखाद्या राजपुत्राच्या यशस्वी प्रेमकहाणीसारखं आहे. जायबाची मोहनाशी दृष्टिभेट झाल्यापासून दोहोंचा शाही विवाह होतो, एवढंच हे कथानक असलं तरी जायबाचे पराक्रम एकामागून एक शब्दबद्ध करीत राहिल्यामुळे दोन्ही घराणी कशी हळुहळू जवळ येत राहतात. जायबा मोहनाबरोबर तिचे पिताश्री उधाजीराव यांचंही मन कसं जिंकतो, हेही या कादंबरीसदृश लेखनात वाचायला मिळतं. त्याचबरोबर स्वामींच्या आशीर्वादानं जायबाच्या जीवनात चमत्कार घडतात. एका आदिवासी वीराचं राजघराण्याच्या संस्थापकात रूपांतर हा चरित्र-कहाणीचा मूळ उद्देश असणार, यात शंका नाही. लेखक जायबाच्या घराण्याचा अठराव्या पिढीचा वंशज. त्यामुळे लेखकाचा ही जीवनकहाणी लिहिण्याचा अधिकार तर खराच. मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी सव्वाशे वर्षं झालेला तशाच प्रकारचा लहानसा प्रयत्न एका शूरवीर आदिवासी युवकानं केला, हे लक्षणीय म्हणावं लागेल. जव्हार राज्य स्थापणार्‍या जायबाची कहाणी ही शिवरायांइतकीच ऐतिहासिक महत्त्वाची मानावी लागेल. डॉ. गोविंद गारे या आदिवासींवर संशोधन करणार्‍या संशोधकानं लिहिलेल्या ‘आदिवासी वीरपुरुषां‘त (१९८६) जायबांची कहाणी थोडक्यात यासाठीच दिली आहे.

जायबा हे मुकणे राजघराण्याचे मूळपुरुष. घराण्याच्या कुटुंबीयांत सर्वश्रेष्ठ तेच ठरले. जव्हारला भेट देताना जायबांची जीवनकहाणी वाचलेली असेल तर तिथं आज जुन्या वास्तू उभ्या नसल्या तरी जव्हारचा इतिहास नजरेसमोर तरळायला लागेल. एकेक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहील. मोकळ्या मैदानावर काही नसताना घोड्याच्या टापा ऐकू येतील, तलवारीच्या चकमकीचे आवाज ऐकू येतील.

-संग्रहित माहिती 
सौजन्य- इंटरनेट

0 comments:

Post a Comment

 

Popular Posts

प्रतिक्रिया...

भलरत्रैमासिक हे आदिवासी समाजासाठी असून त्यात आपणास सुचणारे अपेक्षित बदल सुचविण्याचा अधिकार सर्वांना आहे. आपल्या सुचना किंवा प्रतिक्रिया bhalarmasik@gmail.com वर किंवा ९८९०१५१५१३ या नंबरवर Whats App करा.

Total Pageviews

Vidrohi Adivasi

Followers