========================================================================
आतल्याची गंगी
पाटलाचा
सम्या नेहमी आतल्याच्या गंगीमागं हिंडायचा. दोघं गुरांकं रावणाच्या माळावर
गेल्यावर पक्की गुलु गुलु बोलायची. आतल्याची गंगी म्हणजे लाखात एक....सा-या
प्याहरात शोधून गावणार नाय अशी लाडकी लेक व्हती. पाटलाचा सम्याही तसा मोठा
रुबाबदार देखणा गडी. बापाच्या लाडात वाढलेला पण शिक्षणात मार खाल्ला.
गंगीच्या नादाला लागला आणि साळेत जाणारे पाय नदीच्या पल्याड असणा-या
रावणाच्या मळ्याकडं वळत असत. त्यामुळं दोघांचंही शिक्षाण बोंबाललं व्हतं.
आता त्यानला ती नदी आणि तो रावणाचा माळ म्हणजे सोन्याची लंकाच भासत
व्हती....कारण तिथं त्यांच्या प्रेमात कोणी अडथळा बनत नव्हतं.
मांजरानं
दूध डोळं झाकून पेलं म्हणजे त्याची खबर जगाला लागत नाही असं होत नही.
सम्या आणि गंगीच्या बाबतीत तसंच घडलं. आतल्याला आपल्या पोरीच्या प्रेमाची
कुणकुण लागली व्हती. गावात कुत्री मारत हिंडणा-या उद्धवनं आपल्या लंगोटी
मित्राला त्याच्या पोरीच्या प्रेमाची खबर दिली होती.
आपली
गंगी असं काय करील यावर सुरुवातीला इश्वास बसत नव्हता....पण उद्धव खोटं
बोलल असंही नव्हतं. गंगीला कसं समजावायाचं या चिंतेत आतल्या तासनतास इचार
करू लागला. तसा तो पोरीच्या प्रेमाला इरोध करीत नव्हता. पण आपुन आदिवासी
आणि तो पाटील मोठ्या जातीतील....आपलं काय संबंध जुळणार नाहीत. परत उद्या
आपल्याच इभ्रतीचा पंचनामा व्हयाचा या भीतीत आतल्याचं आपल्या कामावर ध्यान
लागत नव्हतं.
आपल्याला यातून काही तरी मार्ग
काढाया पाह्यजे नाय तर पोर हातची जायाची आणि चार चौघात तोंड दाखवायला जागा
नै रह्याची म्हणून आतल्यानं साबळ्यांच्या मुकुंदाला मनातली सल बोलून दावली.
कारण तो एकच चार अक्षरं बरी शिकेल व्हता.
........पुढील कथा वाचू निवांत.....गंगीचं लगीन ठरल्यावर.
=========================================================
मातीचा अविष्कार
आज मुंबईच्या चार मित्रांना घेऊन घाटघर, ता अकोले या परिसरात फिरायला गेलो
होतो. जाताना अमृतेश्वरचं मंदिर त्यांना दाखवले. बाराव्या शतकातील झंज
राजाच्या विशेष प्रयत्नातून साकारलेल्या या हेमाडपंथी मंदिराची भुरळ कोणाला
पडणार नाही असे होऊच शकत नव्हते. मित्रांपैकी सतीश काहीसा उत्साही,
निसर्गाचा अविष्कार शोधणारा, तर अमित हा ऐतिहासिक पाऊलखुणा शोधत दगडधोंडे
धुंडाळत फिरणारा होता. प्रवीण हा काहीसा धार्मिक असल्याने त्याने पटकन
अमृतेश्वराच्या पिंडीजवळ माथा टेकवला व डोळे झाकून प्रार्थना करू लागला.
यातला सुरेश मात्र माणसातील संवेदनांचा भुकेला होता. मंदिरापासून काही
अंतरावर चहाची टपरी चालवणा-या एका आदिवासी मुलाशी तो संवाद साधू लागला.
"अरे ये सख्या एक कटिंग दे रे गरमा गरम" अशी ऑर्डर देऊन
गी-हाईक म्हणून जवळीक निर्माण केली होती.
गी-हाईक म्हणून जवळीक निर्माण केली होती.
चहा बनविणा-या मुलाचे नाव काय होते हे माहित नसताना सखा म्हणून त्याला आपले
मित्र बनवून सुरेशने त्याच्या शिक्षणाची चौकशी सुरु केली.
कॉलेजपर्यंतचे शिक्षण राजूरला पूर्ण केले व चांगले मार्कही मिळाले असे तो
मुलगा काहीसा लाजत सांगत होता. सुरेशने त्याला कधी आपलेसे केले हे कुणालाच
कळले नाही.
"पुढे का नाही शिकलास?" असा प्रश्न विचारल्यावर त्या मुलाच्या चेह-यावर
काहीसे चिंतेचे सावट दिसू लागले. यातून त्याला पुढे शिकून काही तरी
करण्याची इच्छा असल्याचे संकेत दिसत होते.
"वडील वारल्याने घराची जबाबदारी खांद्यावर पडली अन मग काय पुढचं सारं बंद
झालं आणि मग मी हा इथं चहा इकतोय......" असं म्हणून त्यानं आपला आवंढा
गिळला. मनातली घुसमट त्यानं काही शब्दांत व्यक्त केली होती.
सुरेशने त्याला मुंबईला नोकरी शोधण्याचा सल्ला दिला. त्यावर तो पण म्हटला
कि, "मलाही वाटत होतं की बी. एस्सी.च्या चांगल्या मार्कांच्या जोरावर
मुंबईला जावं व एखादी सरकारी नोकरी मिळवून कुटुंबाला हातभार लावावा. पण
घराचा आधारच यावेळी हिरावल्याने नियतीनं मला गाव सोडू दिलं नाय."
आता सुरेशही भावनाविवश झाला होता. त्यालाही त्या सख्याच्या वेदना जाणवत होत्या. पण तो हतबल होता.
"आता पुढे काय?" असा सुरेशने त्याला प्रश्न विचारला.
"काय नाही...ज्या जबाबदा-यांनी मला या गावात राहायला भाग पाडलं त्या पार
पाडून मन मोकळं करत आहे या रानावनात....माझ्या स्वप्नांना खीळ बसली म्हणजे
मी नाराज आहे असं नाही. चहा वाटत खूप काही आनंद मिळतो जगातल्या विविध
लोकांना सेवा देण्याचा....त्यात थोडीशी जी शेती आहे ती करण्यात आणि त्यात
घाम गाळण्यात सर्वाधिक आनंद मिळतो....कदाचित तो शहरात मिळत नसावा."
सुरेशला आता काय बोलावे तेच सुचत नव्हते. सखाच्या आनंदाचे रहस्य अधिक उलगडण्याचा तो प्रयत्न करत होता.
"किती मुलं आहेत?" सुरेशने हळूच विचारले.
"दोन आहेत...दोन्हीही मुली.... पण फार गुणी आणि शाळेत हुशार आहेत." सखाने हसत उत्तर दिले.
"त्यांच्या शिक्षणाचं काय?"
"इथं गावात चौथीपर्यंत शिकवतो....मग पुढं संगमनेर किंवा ओतूरला शाळेत
टाकणार आहे. मी नाही मुंबईला जाऊ शकलो. पण माझ्या मुली माझं स्वप्न पूर्ण
करतील....त्यासाठी मी माझ्या रक्ताचं पाणी करायला तयार आहे".
सख्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचं कौतुक करावं ते थोडंच होतं. आपल्या
मुलींना खप शिकविण्याचा सल्ला देऊन अमृतेश्वराच्या मंदिराकडे सुरेशचालू
लागला. मंदिराचे आखीव रेखीव दगडी कोरीवकाम सख्याच्या भावनांपुढे त्याला
फिके वाटत होते. या मातीत संस्कारांचं जे बीज पेरलेले आहे, त्याचा अनोखा
अविष्कार त्याला अनुभवायला मिळाला होता. या अशाच माणसांच्या शोधात सुरेश
प्रत्येक सुट्टीत आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावांत भटकत असतो. आपला असा
भटकंतीचा प्रत्येक दिवस सार्थकी लागतो व जगण्याची ऊर्जा देतो असे तो काहीसा
सर्वांना सांगत होता.
-राजू ठोकळ
===========================================================
राजू ठोकळ लिखित दुसरी कथा आपल्यासमोर आणताना मनस्वी आनंद होत
आहे. प्रगतीच्या प्रवाहात मनसोक्त विहार करण्याच्या नादात आपण आपला आधारवड
हरवत चाललोय असेच चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळते.....आणि हे प्रमाण वाढत
जाणारे आहे. दुर्दैवाने सांगावेसे वाटते कि आपल्या उंच राहणीमानाच्या नादात
आपण आपली माती, नाती, गावाकडील माणसं, त्यांचे संस्कार विसरत आहोत यावर
प्रकाश टाकणारी हि कथा आपणास कशी वाटली याच्या प्रतिक्रिया आपण 9890151513
या whats app नंबरवर जरूर कळवा.
आधार कार्ड
पार्वती आज्जी तशी स्वभावाने थोडी तापट असली, तरी कोणी गरजू
जर तिच्या दारावर आला तर कधी परत फिरला नाही. त्यामुळे तिला पंचक्रोशीत
कोणी ओळखत नाही असा शोधूनही कोणी सापडणार नाही. दोन मुले आणि एक मुलगी असा
लहानसा परिवार ती हातावर मिरची भाकर खाऊन जपत होती. कुंकवाचा धनी तीला खूप
लवकर सोडून गेल्याने रांडकेपणाची सल तिला खूप त्रास देत होती. नवरा
गेल्यावर सा-या किरमिरा गावातील लोकांनी तिला मदत करण्यासाठी हात वर केले.
पण ती डगमगली नाही. आपल्या लेकरांना घेऊन तिने वाट्याला आलेली तीन चार
वावरांची शेती मोठ्या कष्टाने सावरली.... नांगरली.... पेरली....कसली.
दिसामागून दिस जात होते. पार्वती आज्जी मुलांना तळहातावरील
फोडाप्रमाणे जपत होती. स्वतः शिकलेली नसली तरी पोरांना तिने शाळेत टाकले
होते. पोरांनी खूप शिकावं....मोठ्ठ व्हावं....आपला संसार सुखात थाटावा
एवढीच तिची अपेक्षा होती. दिवस रात्र ती कष्ट करत होती....मुलांना जी
लागतील ती सारी पुस्तके, वह्या ती घेऊन देत होती. तिची तिन्ही मुलंही
अभ्यासात हुशार होती.
मोठ्या मुलाने म्हणजे ईश्वरने बी एस्सीला कॉलेजात सर्वाधिक
गुण मिळविले....त्याच्या कष्टाचे चीज झाले होते....खरे तर पार्वती
आज्जीच्या पुण्याईची ही कमाई होती. आता त्याला पुणे किंवा मुंबईला शिकायला
जाण्याची इच्छा होती. परंतु शहरात शिकायचे म्हणजे खर्च हा अधिक येणार होता.
त्यात खंडू आणि वनिता हि भावंडे त्याच्यामागून शिकत होती. ईश्वर जसा
अभ्यासात हुशार होता.....तसाच तो दिसायलाही राजबिंडा होता. त्याचं देखणं
रूप व त्याची हुशारी पाहून त्याच्या मामाने त्याला मदत करण्यास स्वताहून
शब्द दिला. यात त्याने फक्त आपल्या मोठ्या मुलीचा, आर्चिचा, हात देऊ केला
होता.
भावाने आपल्या अडचणीच्या काळात आपल्याकडे कधी ढुंकून बघितले
नाही. कधी आपुलकीचे चार शब्द ऐकवले नाही.....आणि आज तो अचानक ईश्वरचा
संपूर्ण खर्च करायला तयार झाला होता. पार्वती आज्जीला खरं तर भावाच्या या
कपटीपनाचा राग आला होता. परंतु ती मदत स्वीकारण्यावाचून दुसरा काही पर्याय
नव्हता. शेवटी ईश्वर पुण्याला शिकायला गेला तो पण मामाच्या मदतीने.
पार्वती आज्जी लोकांच्या अडचणीत मदत करत होती. स्वताच्या
शेतात राबत आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण करत होती. आपल्या मुलांच्या
स्वप्नांना बळ देणं हेच तीच्या जगण्याचे ध्येय होते.
ईश्वरबरोबर तीचा दुसरा मुलगा व मुलगी यांच्याही उच्च
शिक्षणासाठी पार्वती आज्जीनं जीवाचं रान केलं. त्यांना हवं ते सारं पुरवलं.
स्वताच्या पोटाला चिमटा देत हौस मौज, सणवार सारं विसरली व तीने मुलांचे
शिक्षण पूर्ण केले. ईश्वरला आय टी कम्पनीत मोठ्या पगाराची नोकरी लागली.
आईला वाटले आता आपल्या डोक्यावरील ओझे कमी झाले. पण नियतीच्या मनात काही
वेगळेच लिखित होते. ईश्वरला जशी नोकरी लागली, तसा त्याचा मामा बहिणीच्या
घरी येऊन बसू लागला. त्याच्या मुलीचा सून म्हणून तीने स्वीकार करावा असा
आग्रह करू लागला. पार्वती आज्जीला वाटत मुलीचे अगोदर हात पिवळे
करावेत....पण तिचा भाऊ तिला काही सोडत नव्हता. शेवटी वैतागून पार्वती
आज्जीने ईश्वरच्या लग्नाला परवानगी दिली.
घरात आनंदाचे वातावरण होते. शेजारी आणि पाहुणे यांची ये जा
सुरु होती. सारेच पार्वती आज्जीने खाल्लेल्या खस्ता आठवून तिला तिच्या
कर्माचे चीज झाले असे सांगत होता. तिकडे आपल्या मुलीला मनासारखा व मोठ्या
पगाराचा जावई मिळाल्याने पार्वती आज्जीचा भाऊ खूप खर्च करत होता. आज पर्यंत
गावात कोणी इतका खर्च केला नसेल असा खर्च तो करत होता. लग्नाची तारीख जस
जशी जवळ येत होती तस तशी पार्वती आज्जीच्या मनावरील दडपणाची जाणीव तिच्या
मुलीला होती. ती सतत आपल्या आईला आधार देऊन सर्व काही ठीक होईल असे सांगत
होती.
ठरल्याप्रमाणे अगदी थाटामाटात लग्न पार पडले. लग्नाला
पाहुण्यांची तुफान गर्दी झाली होती. घरात सून आल्याने सर्व घर आनंदून गेले
होते. आता पार्वती आज्जीला कामात मदत होणार असे अनेकजण बोलून दाखवत होते.
लग्नानंतर ईश्वर कामाला निघून गेला. दुस-या मुलाची व मुलीची
परीक्षा असल्याने ते दोघे पण निघून गेले. सुनेचे नाव अलका असले तरी पार्वती
आज्जी तिला आक्का म्हणून अगदी लेकीप्रमाणे हाक मारत होती. घरातील लहान
मोठ्या कामात ती अलकाला मदत करत होती. बापाची एकुलती एक मुलगी असल्याने व
तिची इच्छा गावाला राहण्याची मुळीच नसल्याने ती मात्र सासूच्या कोणत्याही
सांगण्याकडे लक्ष्य देत नव्हती. जेवण झाल्यावर रात्री लवकर झोपणे, भांडी न
घासणे, सकाळी उशिरा उठणे, पाणी न भरणे, आलेल्या पाहुण्यांशी नीट न वागणे
अशा काही गोष्टी सुनेकडून घडत असताना पार्वती आज्जी मात्र शांतपणे सर्व
कामे पूर्ण करत होती. आपल्यामुळे नवीन जोडप्यात दुरावा निर्माण होऊ नये
म्हणून ती ईश्वरला खरं काही सांगत नव्हती. तिकडे अलका मात्र ईश्वरला
आईविषयी खूप काही वेगळे पटवून देत होती. त्याचा विश्वास बसत नव्हता, परन्तु
तो अलकालासुद्धा काही समजावत नव्हता. शेवटी वाद नको मानून त्याने अलकाला
सोबत घेऊन जाण्याचा विषय आईकडे काढला. आईने पटकन होकार देऊन टाकला. कारण
तिला पण मुलाचे मन दुखवायचे नव्हते. एक दिवस सर्व साहित्य घेऊन ईश्वर
अलकासोबत पुण्याला आला.
पार्वती आज्जीचा दुसरा मुलाला पदवीच्या परीक्षेत चांगले गुण
मिळाले होते. त्याला पण निकालानंतर लगेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून
उच्च पदावर नोकरी लागली होती. आपल्या मुलीचे काही बरेवाईट करावे हा विचार
सतत तिचा मनात येत असे. एक दिवस दूरच्या नात्यातील साबळ्यांचा मुलगा जो एका
चांगल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, त्या मुकुंदचे मागणे आले. मुकुंद
अगदी मनमिळावू, दिसायला सुंदर आणि सुसंस्कृत...! पार्वती आज्जीने आपल्या
सुमीचा हात देऊन टाकण्याचे ठरवले. सुमीला लग्नाचा परवानगीविषयी विचारण्यात
आले. स्वतः मुकुंदने पार्वती आज्जीसमोर सुमीला कोणी मुलगा प्रेमात पडला
असेल तर सांग असे विचारले. सुमीने लाजत तसे काही नाही असे म्हटल्यावर
लग्नाच्या तयारीला सर्वजण लागले.
सुमीच्या लग्नाची तयारी सुरु असतानाच पार्वती आज्जीने आपला
दुसरा मुलगा अतुलच्याही लग्नाचा विचार सर्वांना सांगितला. जर शक्य असेल तर
दोन्ही लग्न एकत्र करण्याचा विचार तिने बोलून दाखवला. सर्वांनी आपापल्या
नात्यातील मुली दाखवायला सुरुवात केली. अतुल उच्चं पदावर सरकारी नोकरीत
असल्याने अनेकांनी अनेक प्रलोभने दाखविण्याचा प्रयत्न केला. पार्वती आज्जी
मात्र अतुलच्या पसंतीची मुलगी आपल्याला सून म्हणून हवी असे सांगत होती.
अतुलने आपल्याच वर्गात असणा-या कांबळे काकांची मुलगी, सविता, आईला सुचविली.
कांबळे काका आपल्या जातीतील नसल्याने सुरुवातीला पार्वती आज्जी गप्प
राहिल्या. परंतु आता कुठे कोण जात पात बघतो असे तिने मनात ठरवून सविताला
सून म्हणून स्वीकारायला होकार दिला. अतुलने लगेच कांबळे काकांना सविताला
मागणी घातली.....मुला-मुलीची पसंती असल्याने मनातील सर्व विचार बाजूला ठेऊन
या आंतरजातीय विवाहास मान्यता दिली.
लग्नासाठी सर्व खर्च ईश्वर करणार असला तरी पार्वती आज्जीने
आपल्या कष्टाच्या कमाईतून बाजूला काढून ठेवलेल्या पैशातून मुलीला हवे तसे
दागिने खरेदी केले. दोन्हीही लग्न मोठ्या उत्साहात पार पडली.
ईश्वर व अतुलने पार्वती आज्जीला आग्रह केला कि आई तू पण
आमच्या बरोबर राहायला चाल.....परंतु तिने आत्ताच नको म्हणून नकार दिला. ती
सांगत होती कि आपली शेती आणि आपला गाव सोडून मी शहरात नाही राहू शकत.
पार्वती आज्जी आपला गावाकडे राहन्याचा हट्ट सोडत नव्हती. सुमीनेसुद्धा
आपल्या आईला आपल्यासोबत येण्याचा आग्रह धरला होता. परंतु त्यालाही नकार देत
पार्वती आज्जी म्हणत होती कि गावाशी असणारी नाळ तोडून मी कुठेच जगू शकत
नाही.
अधूनमधून सणाला मुलं भेटायला येत होती. आता सर्वांना मुलं
झाली होती. आपली नातवंडं आल्यावर आज्जी त्यांचा मुक्का घ्यायची.....त्यांना
खूप गोष्टी सांगायची. तिचं सारं घर आनंदानं बहरून जायचं. दोन दिवसांनी
सर्व गेल्यावर मात्र आज्जीला ते घर खायला उठत असे. आता पार्वती आज्जीला
पूर्वीसारखे काम होत नव्हते. त्यामुळे शेत आता पडीत होते. आपले शेत पडीक
असल्याची सल आज्जीला सहन होत नव्हती. परंतू वयानुसार ती आता काही करू शकत
नव्हती. तशी तिला काम करण्याची गरज नव्हती कारण दोन्ही मुले तिला खर्चाचे
पैसे पोस्टाने पाठवत होते.
ईश्वरला पुण्यात एक फार्महाऊस घ्यायचे होते. आपल्या पगारातून
शिल्लक असणारी रक्कम पुरेशी नव्हती. अतुलकडे मदत कशी मागावी हे त्याला सुचत
नव्हते. शेवटी त्याने त्याला फोन करून आपल्या पडीक जमिनीचे काय करायचे असे
विचारले. अतुलला समजून चुकले कि याला नेमके काय म्हणायचे आहे. आपली आई
जमीन विकायला कधीच परवानगी देणार नाही असे तो ईश्वरला सांगत होता. परंतु तो
काही ऐकत नव्हता.
सकाळची वेळ होती. एक पांढ-या रंगाची महागडी गाडी गावात येऊन
थांबली. कोणी तरी साहेब गावात आला आहे कि काय म्हणून सारा गाव जमा झाला
होता. गाडीत ईश्वर, अतुल आणि त्यांच्यासोबत काही पाहुणे होते. गावात
सर्वांनी त्यांचे स्वागत केले.
अतुल आपली जमीन पाहुण्यांना दाखवायला गेला. ईश्वर आईकडे
त्याच्या मनात काय आहे ते सांगू लागला. पार्वती आज्जी त्याच्या निर्णयावर
पुरती नाराज होती. आपली जमीन विकायची हा विचार तिला मनातून मारत होता. ती
नाही म्हणत होती....ईश्वर तिला त्याच्या अडचणी सांगत होता. शेवटी आपल्या
मुलांच्या सुखासाठी तिने आपल्या जमिनीचा बळी देण्याचे ठरवले.
ईश्वर व अतुलने मोठ्या किमतीत जमिनीचा सौदा केला. त्यातील
काही हिस्सा सुमीला पाठवून दिला. काही रक्कम घर खर्चासाठी पार्वती आज्जीला
देऊ केली. परंतु पार्वती आज्जीने त्यातील फुटी कवडी घेण्यास नकार दिला.
व्यवहार पूर्ण करून ईश्वर व अतुल आईला गावाला ठेऊन निघून गेले. इकडे जमीन
विकली गेल्याने पार्वती आज्जी खचली होती.
पूर्वी सणावाराला येणारी मुले, सुना, नातवंडे आता येणं कमी
झालं होतं. सांगायला पार्वती आज्जी सुखी असली तरी मनातून नातवंडं, मुलं
यांचा विरह तिला सहन होत नव्हता. आता तिला वाटत होते कि आपण मुलांमध्ये
जाऊन राहावे. परंतु आता तिला कोणी आपल्याकडे येऊन राहण्याचा आग्रह करत
नव्हते. सुमीला आपल्या आईची हि अवस्था सहन होत नव्हती. परंतु जावयाकडे जाऊन
राहणे तिला मान्य नव्हते.
पार्वती आज्जीला कोणी तरी सांगितले कि आधार कार्ड काढल्यावर
सरकारी सवलती मिळतात. बस प्रवासात अर्धे तिकीट पडते. आज पार्वती आज्जी
सकाळीच सरपंचाच्या घरी आली होती. तिला आधार कार्ड काढायचे असल्याने ती
रहिवासी दाखला मागत होती. आयुष्यभर आपल्या मुलांच्या आयुष्याला आधार देत
तिनं हे जग पाहिलेलं नव्हतं.....आता ते जग तिला स्वतः पाहायाचं होतं. कारण
या जगात तिचा आधार असणारी दोन्ही मुलं कुठे तरी हरवली होती.
-राजू ठोकळ
www.rajuthokal.com
www.rajuthokal.com
============================================================
असंच एक जुनं पुस्तक चाळताना अमृताला एक वाक्य पुन्हा पुन्हा
वाचावं असं वाटत होतं. कितीही प्रयत्न केला तरी त्या विचारात आज ती अडकून
पडली होती. "सर्व सुंदर चेहरे मनाने चांगले असतातच असे नाही" या विचाराची
भुरळ तिला पडावी या पाठीमागे खूप मोठा आठवणींचा ओलावा होता. आज ती त्या
मागच्या आठवणी इच्छा नसताना एकांतात मनाच्या कोप-यात आठवत होती. एक एक क्षण
तिला काहीसा उद्विग्न करत होता.
अमृता दिसायला जशी सुंदर होती, तशी अभ्यासात हुशार होती.
सदूबाची एकुलती एक मुलगी असल्याने खूपच लाडात वाढलेली. संपूर्ण आंबेवाडीत
तिच्यासारखी नेतृत्व करणारी मुलगी नव्हती. गावात कोणताही सण असुद्या, त्यात
हि सर्वांना सामावून घेत होती. ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन,
आरोग्य शिबीर, आदिवासी संस्कृती संवर्धन, व्यवसाय मार्गदर्शन असे विविध
कार्यक्रम ती आपल्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणींच्या मदतीने आयोजित करत
होती.
सामाजिक कार्याची खूपच आवड असल्याने तिची सर्वजण वाहवा करत होते.
मुलीच्या शिक्षणासाठी सदूबाने तिला तालुक्याला शासकीय
वसतिगृहात ठेवलेले होते. गावाकडे महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नसल्याने
त्यांना अमृताला घरापासून दूर ठेवावे लागले होते.
अमृता आपला अभ्यास वेळेत पूर्ण करत होती. बीएडच्या
अभ्यासक्रमात खरे तर सर्व काही वेळेत पूर्ण करावं लागतं. सर्व
प्राध्यापकांना तिचा अभिमान वाटत होता. निकाल लागला व त्यात अमृताला
डिस्टिंक्शनमध्ये गुण मिळाले. निकालानंतर लगेच तिला कनिष्ठ महाविद्यालयात
नोकरी मिळाली होती. आपल्या मुलीच्या यशाने सदूबा खूप आनंदी होता.
रविवार व सोमवार अशी जोडून सुट्टी आल्याने एक दिवस अमृता गावी
आली. गावातील सर्वच लोक तिला भेटायला आले होते. सर्वांना तिच्या यशाचा
हेवा वाटत होता. 'पोरीनं बापाचं नाव राखलं' अशा प्रतिक्रिया तिला ऐकू येत
होत्या. सदूबा आणि कमला हे दोघे तर मुलगी आल्याने खूपच हुरळून गेले होते.
संध्याकाळी गोड जेवण बनविण्यात आले. आज खूप दिवसांनी तिघे एकत्र जेवण करत
होते. त्यांच्या मनसोक्त गप्पा जेवण झाल्यावरही खूप उशिरापर्यंत सुरु
होत्या. कमलाने आता खूप उशीर झालाय आता झोपायला पाहिजे अशी आठवण करून
दिली. झोपण्याची आठवण होताच अमृताने सदूबाला म्हटले,"बाबा, तो पवारांचा
विक्रम आहे ना तो मला खूप आवडतो....मला त्याच्याशी लग्न करायचे आहे".
क्षणार्धात सारं आकाश कोसळावं आणि त्यात दडपून जीव गुदमरून जावा अशी अवस्था
सदूबाची झाली होती.
आदिवासी कुटुंबात मुलीला प्रमुख स्थान दिले जाते. लग्नात
मुलीच्या पसंतीला महत्व दिले जाते. असे असतानाही सदूबा होकार देत नव्हता व
नकार देण्याची त्याची हिम्मत होत नव्हती. कारण त्याचे आपल्या मुलीवर
जीवापाड प्रेम होते आणि नकार देऊन तिला परकं करायचं नव्हतं. सदूबाचा
अमृताच्या प्रेमविवाहाला खरे तर विरोध नव्हता. विक्रम पवार हा दिसायला
सुंदर होता. त्यामुळे त्याने अलगद अमृताला आपल्या जाळ्यात ओढले होते याची
जाणीव सदूबाला होती. विक्रम हा पराजातीचा होता. त्यात तो दहावी
नापास.....आणि कोणत्याही प्रकारच्या कामाची कुवत त्याच्याकडे नव्हती. गावात
उनाडक्या करत फिरणे हेच काम तो करत होता. त्यामुळे सदूबा अमृताला सांगत
होता, "अगं...तुला लग्नच करायचं आहेस तर दुसरा पण लायक मुलगा बघ
तुझ्यासारखा शिकलेला." अमृता काही ऐकायला तयार नव्हती. "करिन तर
त्याच्याशीच लग्न करील" असा हट्ट ती व्यक्त करत होती. "त्याचं तुझ्यावर
प्रेम नाही तर तुझ्या पगारावर आहे" असे सदुबा तिला खूप समजावत होते.
"त्याच्या सुंदर चेह-यावर जाऊ नकोस....त्याचं काम बघ" असे
म्हणून सदूबा झोपायला निघून गेला. पंधरा वीस मिनिटांच्या त्यांच्या
संवादातून सदूबा पुरता हतबल झाला होता. त्याला झोप येत नव्हती. तो आपल्या
घराच्या छताकडे पाहून सारखी कूस बदलत होता.
सकाळ झाली अमृता गावात जुन्या मैत्रिणींकडे भेटायला गेली
होती. सदूबा नेहमी लवकर उठून शेतावर फिरून येत असे. आज मात्र तो काहीसा
उदास दिसत होता. दुपार झाली अमृता परत जायला निघाली. नेहमी काळजी घे म्हणून
निरोप देणारा सदूबा आज काही बस स्थानकावर आला नव्हता. अमृताच्या आईला काही
समजत नव्हते कि नेमके काय बिनसले आहे. परंतु ती काही बोलत नव्हती. तो घरात
बसलेला असला तरी त्याला आपल्या मुलीचा विरह सहन होत नव्हता. त्याचे
तहानलेले प्रेम आता कसे भरून निघणार या विचारात तो मनातल्या मनात तडफडत
होता.
अमृताला आपल्या वडिलांची मानसिकता माहीत होती. परंतु
विक्रमच्या प्रेमात तिला काही उमजत नव्हते. विक्रमने तिला लग्नाबद्दल वडील
काय म्हणाले ते विचारले. "देतील रे होकार....आपण वाट पाहू.....पुन्हा
त्यांना विनंती करू" असे अमृता त्याला समजावत होती. दोन चार दिवस गेले कि
तो पुन्हा लग्नाचा विषय तिच्यासमोर मांडत असे. आता अमृताने आपली जिवलग
मैत्रीण किर्तीला हा संपूर्ण विषय समजावून सांगितला. अमृताने वडील का नकार
देत आहेत हे मात्र तिला काही सांगितले नाही.
एक दिवस अमृता व कीर्ती या दोघी आंबेवाडीला आल्या. कीर्तीची
हि पहिलीच वेळ गावाला येण्याची असली, तरी सदूबाबरोबर ती अनेकदा फोनवर बोलली
होती. म्हणजे अगोदर त्यांची ओळख होती. कीर्तीने घरात येताच सदूबाला
नमस्कार केला.
"आज कसा काय रस्ता चुकला.....इकडं गावाला आलीस" सदुबाने हसत
विचारले. अमृताच्या आईने दोघीना पाणी दिले व बसायला सांगितले. दुपारची
जेवणाची वेळ टळून गेल्याने आई जेवण तयार करण्यासाठी घरात निघून गेल्या.
अमृताही आईला मदत करण्यासाठी घरात गेली. आता सदूबा व कीर्ती दोघेच गप्पा
मारत होते.
काही वेळ चर्चा झाल्यावर किर्तीने मुद्द्याला हात घातला.
"काका, तुमचं अमृता आणि विक्रमच्या लग्नाविषयी काय म्हणणं आहे?" असा स्पस्ट
प्रश्न किर्तीने केला.
"आता विचार काय करायचा मुली....विक्रमचं वागणं काही धड नाही.
त्याचं शिक्षण तरी किती झालंय...त्याला मुलगी देणं म्हणजे पायावर दगड मारून
घेण्यासारखे आहे", सदुबा पुटपुटला.
"......पण त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर.....आज ना उद्या तो पण काम करेलच कि...."
"कसला काम करतोय....त्याला काम करायचे असते तर कधीच केले असते...असा फिरला नसता गावभर कुत्रे मारत"
"त्याला आपण वेळ दिला पाहिजे....कारण अमृता जीवापाड प्रेम करते त्याच्यावर आणि त्याच्याशिवाय ती जगू शकत नाही".
"अगं मग काय आम्ही तिचे दुष्मन आहोत...आम्हाला काय तिचे चांगले व्हावे असे वाटत नाही का?"
"तसे नाही....पण तरी अजून आपण विचार करावा असे मला वाटते", कीर्ती हळू आवाजात बोलली.
"तिने तिच्या प्रेमाविषयी विचारल्यापासून मी विचारच करतोय. नीट जेवण जात नाही कि तहान लागत नाही....झोपलो नाही मी या विचारानं"
"तुम्ही विनाकारण त्रास करून घेत आहात"
"आता कसला त्रास.....?....तिला जन्म दिला....जीवापल्याड
जपलं...आम्ही उपाशी राहिलो पण तिला काही कमी पडू दिले नाही....अजून काय
करायचे राहिले. नेमके आम्ही कुठे कमी पडलो हेच मला समजत नाही"
"तुमच्या उपकाराची परतफेड होऊच शकत नाही.... परंतु आपण तिच्याही भावना समजून घेतल्या पाहिजेत", कीर्ती सदूबाला सांगत होती.
"आमच्या भावना पायदळी तुडवून तिला जो निर्णय घ्यायचा आहे, तो
तिने घेतला आहे.... तिला जे करायचे आहे ते ती करायला मोकळी आहे, कारण आता
तिला चांगला पगार मिळतोय....तिला कुठे आमची गरज राहिली आहे"
"काका....तरी मला वाटते तुम्ही विक्रमला संधी द्यायला पाहिजे....मला खात्री आहे, तो नक्की स्वताच्या पायावर उभा राहील"
".....जाऊ दे पोरी, तुम्ही दोघी ठरवूनच आल्या आहात....तुम्ही
काय आम्हाला समजून घेणार....पण एक सांगतो, तो मुलगा तिच्या पगारावर प्रेम
करतोय आणि ती त्याच्या बाहेरच्या सुंदर्यावर....म्हणून म्हणतो जगातले सर्वच
सुंदर चेहरे मनाने चांगले नसतात हे तिने समजून घ्यावे.....आणि नसेलच तिला
समजून घ्यायचे तर तिचा मार्ग आम्ही अडविलेला नाही.....ती आमच्याशिवाय हवे
त्या मुलाबरोबर लग्न करु शकते....फक्त आम्ही या लग्नाला येणार नाही",
सदूबाच्या डोळयात पाणी आले होते. तहानलेले प्रेम डोळ्यातून व्यक्त होत
होते....पण ते समजून घेणारे कोणी नव्हते.
सर्वांनी एकत्र जेवण केले. कोणी कोणाबरोबर बोलत नव्हते.
किर्तीला समजत नव्हते कि नक्की कोणाच्या बाजूने आपण उभे राहावे. शेवटी तिने
मैत्रिणीला धीर दिला.
दुस-या दिवशी अमृता व कीर्ती आपल्या नोकरीच्या ठिकाणी परत
आल्या. विक्रम त्यांना घ्यायला हजर होता. विक्रमच्या प्रश्नाला तिने उत्तर
दिले, "आपण कोर्ट मॅरेज करू".
किर्तीनेही या निर्णयाला सहमती दर्शविली. विक्रमच्या
घरच्यांचा या लग्नाला विरोध नव्हता. त्यामुळे लवकरच लग्नासाठी नाव
नोंदविण्यात आले. प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी मुलीकडील कोणीही हजर नव्हते.
मुलाकडील मात्र सर्वच हजर होते. अमृताने किर्तीला सोबत घेऊन लग्नाचे ठिकाण
गाठले होते. प्रेमात वेडी झालेल्या अमृताला आपल्या आई वडिलांचा विसर पडला
होता. लग्न पार पडले होते. दोन दिवसांनी रिसेप्शन निश्चित करण्यात आले.
विक्रमने आपले मित्र व नातेवाईक यांना आमंत्रण देऊन टाकले
होते. अमृतानेही आपल्या मित्र मैत्रिणींना आग्रहाचे आमंत्रण दिले होते.
लग्न झाल्याच्या आनंदात ती आई वडिलांना बोलवायला विसरली होती. कीर्तीने
मात्र अमृताला न विचारता सदूबाला निरोप दिला होता. आपल्या पोटच्या गोळ्याने
आपला घात केला या नुसत्या विचाराने तो अर्धमेला झाला होता. आता सारं संपलं
या विचाराने त्याने रिसेप्शनला जाण्याचा विचार सोडून दिला....आपल्या
मुलीसह....!
मुलीने लायक नसलेल्या मुलासोबत लग्न केले या विचारात सदूबा
पुरता खचला होता. त्याचे मन कशात लागत नव्हते. ज्या मुलीसाठी आपण आपलं
सर्वस्व....आयुष्य खर्च केलं....त्या बदल्यात तिनं अशी भरपाई करावी हे
अनपेक्षित होते. आपणच तिच्यावर अधिक चांगले संस्कार करण्यात कमी पडलो असा
विचार करून तो स्वताला दोष देऊ लागला होता.
नवीन लग्न झाल्याने पाहुण्यांची वर्दळ वाढली होती. नोकरी
सांभाळून त्यांचा पाहूणचार करताना अमृताला तारेवरची कसरत करावी लागत होती.
तिचे सासू-सासरे पगारदार व पडेल ते काम करणारी सून मिळाल्याने आनंदी होते.
म्हणतात ना नवरीचे नऊ दिवस तसे विक्रम सुरुवातीला तिची खूप काळजी घेत होता.
त्यामुळे अमृताला आपण अगदी योग्य जोडीदार निवडल्याचा अभिमान वाटत होता.
विक्रम व अमृता कुलू मनाली येथे हनिमूनसाठी गेले. त्याचा पूर्ण खर्च
अमृताने केला होता. तिकडून आल्यावर विक्रमने नोकरी किंवा कुठे तरी कामधंदा
करावा असा आग्रह मात्र ती धरत होती. तो सुद्धा होकार देऊन तिच्या पैशावर
मजा मारत होता.
सदूबाला जणू काही एखादा गंभीर आजार झाला असावा अशी त्याची
तब्येत खराब झाली. परंतु तो काही दवाखान्यात जायचे नाव घेत नव्हता. शेजारी
तसेच स्वताची पत्नी यांनी अनेकदा आग्रह करूनही तो अमृताच्या लग्नाची गोष्ट
विसरायला तयार नव्हता. या आजारपनात सदूबा एक दिवस हे जग सोडून कायमचा निघून
गेला. त्याच्या अंत्यविधिला अमृता येऊ शकली नाही. खरे तर तिला विक्रमने हि
खबर तिच्यापासून लपवली होती.
विक्रम चार पाच दिवस एखाद्या कंपनीत कामाला जायचा.....परंतु
कामाची सवयच किंवा मानसिकता नसल्याने तो त्यापेक्षा अधिक काळ कामावर टिकत
नव्हता. त्याचा संपूर्ण खर्च अमृताच्या पगारातून होत होता. हळूहळू तिला
त्याच्या व्यसनांविषयी माहिती होत होती. त्यावरून त्यांच्यात अनेकदा वाद
होत होते. या वादात तिचे सासू सासरे मुलाचीच बाजू घेत असल्याने तिची खूप
चीडचीड होत होती. लग्नानंतर घरातले कोणीही बाहेर कामाला जात नव्हते कि
घरातील कोणतेही इतर काम करत नव्हते. संपूर्ण कामाचा ताण तिच्यावर आल्याने
आता तिला आपल्या आई वडिलांची आठवण येऊ लागली होती. तिने किर्तीला आपली
घुसमट बोलून दाखविली. कीर्तीने लगेच आंबेवाडीला संपर्क केला....तेव्हा तिला
समजले कि अमृताचे वडील सदूबा काका कधीच मृत्यू पावलेले आहेत. तसाही
निरोपही विक्रमला दिला होता. परंतू का कुणास ठाऊक त्याने ती वार्ता
अमृतापासून लपवली होती. कीर्तीचे डोळे पाणावले होते....मन भरून आले होते.
तिने आईचा तपास केला, तर आई कुठे नातेवाईकाकडे गेलेली आहे....पण नेमकी कुठे
हे मात्र समजू शकले नाही. अमृताच्या एका निर्णयाने संपूर्ण कुटुंब उध्वस्त
झाले होते याची जाणीव तिला होत होती. आता तिला क्षणाचाही विलंब न करता हि
खबर अमृताला द्यायची होती.
अमृताचे कॉलेज सुटायला अजून अर्धा तास बाकी होता. कीर्ती
कॉलेजच्या स्टाफरूमजवळ तिची वाट पाहू लागली. कॉलेजची काही मुले व मुली
बाहेर ऑफ तासाला कट्टयावर गप्पा मारत होते. त्यांच्या हसण्यात तिला अमृताचे
स्मित दिसत होते.अशीच ती सतत हसायची. ते हसणं....ते जगणं तिच्या आई
वडिलांनी जपलं होतं याची पुसटशी कल्पना कीर्तीच्या मनात डोकावत होती. कॉलेज
सुटल्याची घंटा वाजली आणि तिच्या विचारचक्रात खंड पडला. ती अमृताची मोठ्या
आतुरतेने वाट पाहू लागली.
कॉलेजचे विद्यार्थी एकच घोळका करून बाहेर पडत होते. काही
प्राध्यापक मंडळी किर्तीला येताना दिसत होते, परंतु त्यांच्याकडे तिचे
लक्षच नव्हते. तिला दुरूनच अमृता येताना दिसली. खाली मान घालून चालताना
तिला हिने कधी पाहीले नव्हते. नेहमी हसत, उत्साही असाच चेहरा तिचा हिला
माहित होता. ती जसजशी जवळ येत होती, तिच्या अंतर्मनात डोकावन्याचा प्रयत्न
कीर्ती करत होती. पण आज तिला ते जमत नव्हते.
"अमृता कुठे हरवली आहेस?" कीर्तीने न राहवून दुरूनच हटकले.
अमृताला आपल्याशी कुणीतरी बोलत आहे याची जाणीव व्हायला वेळ लागला.
"ये अमृता....हे आमरे.....जरा वर बघ....खाली काय शोधत चालली आहेस?"
आता मात्र ती भानावर आली होती. कीर्तीचा आवाज तिने ओळखला होता.
"काही नाही गं....असंच बोलून बोलून जरा थकवा आलाय....म्हणून....."
"ते जाऊ दे....चल मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे."
कीर्तीने पटकन तिचा हात पकडला व तिला ओढतच जवळच एका निवांत झाडाखाली नेले.
कीर्तीने अमृताला तिच्या आई वडिलांचे काय झाले ते सारं काही क्षणाचाही
विलंब न लावता सांगून टाकले.
आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी विक्रमने आपणास न सांगितल्याने अमृताला विक्रमविषयी तिचे वडील जे सांगत होते ते सर्व खरे असल्याची खात्री पटत होती. आता वेळ निघू गेली होती. आपली आई कुठे असेल या चिंतेने तिचं सारं अंग गळून गेलं होतं. कीर्ती तिला सावरण्याचा प्रयत्न करत होती. खूप खूप रडावं असं अमृताला वाटत होतं, परंतु कॉलेज असल्याने तिनं स्वताला आवरलं होतं.
आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी विक्रमने आपणास न सांगितल्याने अमृताला विक्रमविषयी तिचे वडील जे सांगत होते ते सर्व खरे असल्याची खात्री पटत होती. आता वेळ निघू गेली होती. आपली आई कुठे असेल या चिंतेने तिचं सारं अंग गळून गेलं होतं. कीर्ती तिला सावरण्याचा प्रयत्न करत होती. खूप खूप रडावं असं अमृताला वाटत होतं, परंतु कॉलेज असल्याने तिनं स्वताला आवरलं होतं.
आज अमृताला घरी जावं असं वाटत नव्हतं....किर्तीला तिने काम
असल्याने थोडावेळ थांबावे लागणार असल्याचा बहाणा सांगितला व तिला जायला
सांगितले. तिने स्वतःला आपल्या स्टडीरूममध्ये कोंडून घेतलं व खूप
रडली....रडून तिचे डोळे लाल झाले होते. आता पुढे काय या विचारात तिने जुनी
पुस्तके चाळायला सुरुवात केली.
असंच एक जुनं पुस्तक चाळताना तिच्या नजरेत एक वाक्य आलं...ते होतं, "सर्वच सुंदर चेहरे मनाने चांगलेच असतात असे नाही".
काहीशा उशिराने अमृता घरी जायला निघाली. तिला विक्रमचा चेहरा
वारंवार आठवत होता व तिचा राग अनावर होत होता. परंतु कितीही राग आला तरी ती
असहाय होती. तिच्या बाजूने बोलणारं घरात कोणीही नव्हतं.
घरात सर्वजण तिचीच वाट पाहत होते. उशीर का झाला म्हणून विक्रम
ओरडत होता....तर सासू स्वयंपाक कोण करणार म्हणून आदळ आपट करत होती. अमृता
कोणाशी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. परंतु तिची मानसिकता समजून
घेणारे तिथे कोणीही नव्हते. सासरा थोडासा समाजुतदारपणाचा आव आणत अमृताजवळ
आला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्याने हळूच मूळ मुद्दा बोलून दाखवला.
"दत्तुचं लग्न करायचे आहे.... तेव्हा आपल्याला पैशाची गरज आहे"
"...मग मी काय करू?" अमृताने उलट उत्तर दिले.
दत्तू हा विक्रमचा सर्वात लहान भाऊ होता. घरात कमावणारे दुसरे
कोणीच नव्हते. त्यात यांना शेवटचे लग्न म्हणून जोरदार खर्च करायचा होता.
"तुझ्याकडे असतील तर बघ", सास-याने लगेच विनवले.
"घरातील सर्व खर्च मी करते....प्रत्येकाला खर्चासाठी मीच पैसे देते...आता कुठून आणू पैसे?" अमृता ओरडली.
सास-याने नरमाईची भूमिका घेत म्हटले, "आपण तुझ्या नावावर बँकेतून दहा लाख रुपये कर्ज काढू".
कर्ज हा शब्द कानावर पडताच अमृताला आपल्या वडिलांचे शब्द आठवले "पोरी त्या विक्रमचे तुझ्यावर नाही तर तुझ्या पगारावर प्रेम आहे".
रात्रीचे जेवण झाले. अमृता एकटीच स्वतंत्र खोलीत झोपायला
निघून गेली. तिला आज झोप येत नव्हती. रात्रभर ती सारखी उठून पाणी पित होती.
कधी नव्हे ती आज अमृता आपल्या आई वडिलांच्या प्रेमाच्या तहानेने व्याकुळ
झाली होती. रात्रीचा चंद्र आज तिला परका वाटत होती. पण आता त्याचा काही
उपयोग होणार नव्हता. कारण स्वताच्या प्रेमासाठी तिनं दोन प्रेमाची माणसं
परकी केली होती.....आणि ती त्यांच्या प्रेमापासून पोरकी झाली होती....!
- Raajoo Thokal
www.rajuthokal.com
www.rajuthokal.com
============================================================
- रखमा भगत - आदिवासी कथा
गंगी लगीन होऊन गंभीरवाडीला नांदाया आली. एक दीड वर्षाच्या आत
घरात पाळणा हालला. त्यामुळे सारं आनंदाचं वातावरण झालं होतं. ऊन, वारा,
पाऊस झेलत ती दोन पोरांना सांभाळत आपला मोडका संसार उभा करण्याचे काम करत
होती. सा-यांच्या नजरेत भरावं असं संसार गीत तीन जगायला सुरुवात केली होती.
डोंगरावर शेत फुलवून घरात धान्याच्या राशी तिनं उभ्या केल्या होत्या.
सकाळ झाली होती....पोरं सर्व आटपून शाळेत गेली होती. सखा,
गंगीचा नवरा, बैलांना घेऊन शेतात गेला होता. रोज पहाटेच अंगणात शेणाचा सडा
घालणारी गंगी आज सूर्य डोक्यावर आला तरी घराच्या बाहेर आली नव्हती. आकाशात
जणू काळे ढग जमावेत आणि मनात संकटाची चाहूल लागावी असंच काही तरी होत होतं.
गंगीचं अंग जड पडलं होतं. उठायची इच्छा असूनही अंगात उठण्याची ताकद
नव्हती. अंगावर मोठा डोंगर कोसळावा तसे तिचे अंग दाबून गेल्यासारखे झाले
होते.
"गंगे....ए गंगे.....काय करती गं घरात....दिस पार डोक्यावं
आला तरी तू काय उंबरा ओलांडीना आज....काय औदासा भरली का काय?" शेजारची सखू
आवाज देत होती. परंतु रोज सर्वांना हाका मारणारी गंगी आज काहीच प्रतिसाद
देत नव्हती.
सखूला वाटलं गंगी सकाळीच रानात लाकडं गव-या आणायला गेली
असेल....म्हणून ती पण आपले काम उरकून घेण्यासाठी निघून गेली. घरात डोकावून
नक्की काय भानगड आहे हे बघण्याची तसदी तीनं घेतली नाही.
सखूचा आवाज ऐकून गंगी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत होती,
परंतु तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. अंथरुणातून उठून बाहेर येण्याचे
त्राण तिच्या अंगात उरले नव्हते. तिला उठून खूप कामे पुरी करायची
होती....पण अशक्तपणा तिला तसे करू देत नव्हता. मनोमन ती अनेक देवदेवतांचा
धावा करत, परंतु सारे व्यर्थ....!
सकाळीच रानात बैलांना घेऊन गेलेला सखा दुपार झाली म्हणून
भाकरीची वाट पाहू लागला. परंतु गंगी काय येत नव्हती. त्याच्या पोटात कावळे
ओरडून थकले. भूकही आल्या पावलांनी माघारी फिरली होती. सखाने बैलांना
आंब्याच्या झाडाखाली बांधले व बांधावर सावलीत बसून वाट पाहू लागला. परंतु
दूरवर त्याला कोणी येताना दिसत नव्हते.
सकाळी शाळेत गेलेले पम्या आणि नाम्या बारा वाजता घरी आले.
त्यांना जोराची भूक लागली होती. म्हणून त्यांनी घरात आल्या आल्या
टोपल्याकडे आपला मोर्चा वळवला. टोपल्यावरील झाकण काढताच त्यांना त्यात
काहीच हाती लागले नव्हते. अगदी त्वेषाने त्यांनी आईकडे जेवणासाठी हट्ट
धरण्याचा प्रयत्न केला. आरडा करूनही आई काही प्रतिसाद देत नाही म्हणून
पम्या आणि नाम्याने आईला हाताने हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. कोवळ्या
मुलांना आईला नेमकं काय झालंय हे कळाले नव्हते, परंतु काही तरी बिनसलंय हे
मात्र त्यांनी जाणलं होतं.
नाम्या लहान होता....परंतु चंचल होता. त्याने लगेच शेतात जाऊन
आपल्या वडिलांना आईला काही तरी झालंय असा निरोप दिला. झाडाच्या बुंध्याला
डोकं टेकवून निजलेला सखा इलेक्ट्रिक शॉक बसावा असा ताडकन उठला व पायात चपला
न घालता धावत सुटला. रस्त्यातील काटे त्याला दिसत नव्हते.....गंगीचा हसरा
चेहरा त्याला हाका मारत होता. आपल्याला निरोप द्यायला आलेला नाम्या आला कि
नाही हे सुद्धा त्याने पाहिले नव्हते.
गंगीला काय झालं असेल या विचारात सखा काही वेळातच घरात आला.
गंगीचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन काय झालं म्हणून विचारत होता. खूप इच्छा
असूनही गंगीला काही शब्द फुटत नव्हते. नाम्याला शेताकडून येड्यागत पळताना
पाहून गणप्या आणि धन्या त्याच्या मागं पळत घरे आले होते. गंगीची अवस्था
पाहून त्यांनी गावातील एक जीप काही मिनिटात आणली. कोणाला काही कळायच्या आत
गंगीला घेऊन गाडी तालुक्याला दवाखान्यात जाऊ लागली. सखा हतबल होऊन रडत
होता. गणप्या सखाला धीर देत होता. नाम्या आणि पम्या हि निरागस मुलं आपली
भूख विसरून आईला काय झालं असेल म्हणून एकमेकांना विचारत रडत होती.
एक तासात जीप दवाखान्याच्या दरवाजात उभी राहिली. गणप्या आणि
सखाने उचलूनच गंगीला दवाखान्यात नेले. डॉक्टर काही तरी जादू करतील आणि गंगी
माझ्याशी बोलेल असं सख्याला मनात वाटत होते. दिवसामागून दिवस जात होता.
पम्या आणि नाम्या सखीकडे जेवत होते....आपल्या आईला काय झालंय हे त्यांना
कोणी सांगत नव्हते.
दवाखान्यात चकरा मारून सखा वैतागला होता....परंतु गंगी काही
त्याच्या बरोबर बोलत नव्हती. डॉक्टरपण आता सखाला पाहून उडवा उडवीची उत्तरे
देत होते. सहा महिने पूर्ण झाल्यावर डॉक्टरांनी सखाला सांगितले कि तुम्ही
गंगीला घरी घेऊन जा. ती कोणत्याही उपचाराला साथ देत नाही. तिचे आता काहीच
दिवस शिल्लक आहेत.
"तीचे आता काहीच दिवस शिल्लक आहेत...." असे डॉक्टरचे शब्द
ऐकताच सुखाच्या पायाखालची माती सरकली. त्याच्यावर मोठे आभाळ कोसळले होते.
तो खूप रडत होता. नेहमी संकटात सोबत उभी असणारी गंगी आज मात्र त्याला आधार
देत नव्हती. आईची वाट पाहणारी मुलं त्याला दिसत होती. त्यांचं कसं होईल या
विचारानं सखा हतबल झाला होता. आता जावं आणि जीवाचं बरं वाईट करावं असं
त्याला सारखं वाटत होतं. परंतु गंगीला असं सोडून पळून जाणं त्याला योग्य
वाटत नव्हतं.
संध्याकाळी गाडी करून सखानं गंगीला जड अंतकरणाने घरी आणले
होते. त्याला माहीत होते आता पुढे काय होणार आहे ते....परंतु तो मुलांना
धीर देत होता.
गंगीच्या आईला तिला घरी आणल्याची खबर मिळाली होती. पोटचा गोळा
असा निपचित पडलेला तिला बघवणार नव्हता, परंतु दुसरा काही पर्याय नव्हता.
ती चालतच भंडारद-याहून गंभीरवाडीला निघाली. चालत जाताना तिनं रखमा भगताला
काय झालंय ते सांगितलं...... रखमा नात्यातलाच असल्याने त्याने आपल्या
घरातील काही झाडपाल्याची औषधे पिशवीत टाकली व गंगीच्या आईबरोबर चालू लागला.
सांच्या पहराला दोघे धावपळ करत गंभीरवाडीला पोहचले.
सखाने गंगीच्या आईला डॉक्टरने काय सांगितले ते रडक्या आवाजात
सांगितले व ढसाढसा रडू लागला. रखमा सर्वांना धीर देत होता. रखमा जरी त्या
भागात 'भगत' म्हणून प्रसिद्ध असला तरी तो कधी खोटे मंत्र मारून लोकांना
फसवत नव्हता. आज पर्यंत त्याने अनेकांना आपल्या आजारातून बरे केले होते,
परंतु कोणाकडून फुटी कवडी दक्षिणा म्हणून घेतली नव्हती. त्याला रानातल्या
झाडपाल्याची अचूक माहिती होती.
रखमाने गंगीच्या डोळ्यात बघितले.....नाडी तपासली. काही वेळातच
त्याने स्पष्ट केले कि गंगी लवकरच बरी होईल काही काळजी करू नका. त्याने
आपल्या पिशवीतून काही झाडांची मुळं व काही भुकटी बाहेर काढली. आपले कुलदैवत
कळसूआईचे नाव घेतले व त्याने गंगीच्या तोंडात ती भुकटी चिमूटभर टाकली.
सखाला रखमा भगत देवदूत वाटत होता. कारण तोच एकमेव आता म्हणत होता कि गंगी
लवकरच बरी होईल. त्याने सखाला काही औषधे कशी घ्यायची हे समजावून सांगितले.
काही पथ्य व रोजचा आहार काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या.
रखमा भगताची औषधे सुरु होऊन पंधरा दिवस झाले होते. आता गंगी
घरातल्या घरात काम करत होती. थोड्याच दिवसात गंगी आपल्या सोबत शेतात येणार
या अपेक्षेने सखा जोमाने शेतात काम करत होता. सहा महिने आई आपल्या सोबत
बोलली नव्हती, आता ती थोडी फार बोलू लागल्याने नाम्या व पम्या आनंदी होते.
पंधरा दिवस उलटल्यावर रखमा भगत स्वतः गंगीला भेटायला आला
होता. घरात काम करणारी गंगी पाहून त्यालाही आपल्या सेवेचे सार्थक झाल्याचे
वाटत होते. सखाने तर पाया पडून आभार व्यक्त केले. नाम्या व पम्या दोघेही
बाबा आले बाबा आले म्हणून रखमा भगताच्या भोवती पिंगा घालत होते. पुन्हा
पूर्वीचे सुखाचे व समाधानाचे दिवस आलेत असे सखा पुन्हा पुन्हा सांगत होता.
रखमा भगत हसत हसत काय खावे आणि काय खाऊ नये हे गंगीला सांगत
होता. जेवणात पालेभाज्या, कडधान्य हे खाण्याचे आग्रहाने बोलत असताना रखमा
भगत सखाच्या डोळ्यातील करुण भाव टिपत होता. दुपारची न्याहरी करून सखा
कोणतीही दक्षिणा न घेता आपल्या घराकडे निघाला होता. सखा फक्त रखमाच्या
पाठमो-या आकृतीकडे पाहून मनोमन हजारदा पाया पडत होता. आज गंगी व नाम्या
स्वता गावाच्या वेशीपर्यंत निरोप द्यायला आले होते.
-राजू ठोकळ
www.rajuthokal.com
www.rajuthokal.com
0 comments:
Post a Comment