============================================================================
मुख्य प्रवाह
आदिवासी विकासाच्या योजना (गप्पा) जेव्हा जेव्हा माझ्या कानावर पडतात, तेव्हा बहुतेक तज्ञ व्यक्ति 'आदिवासी मुख्य प्रवाहात' आला पाहिजे असे मत व्यक्त करतात. मुख्य प्रवाह म्हणजे काय असा जर उलट प्रश्न केला तर बोलणा-या व्यक्तिच्या नजरा पुणे, मुंबई अशा मायावी नगरांकडे जातात. आता हा मुख्य प्रवाह खरच स्विकारण्यालायक आहे का?
शहरी भाग म्हटला की बेरोजगारी, गुन्हेगारी, संस्कृतीचा -हास, मुलींची गर्भात केली जाणारी हत्या, पैसा म्हणजे सर्वस्व, स्वार्थी जीवनशैली अशा अनेक बाबी ज्या सामान्य जीवनाला काळिमा फासण्याचा प्रयत्न करत असतात. अलीकडे बलात्कार, अपहरण, बाल गुन्हेगार, व्यसने अशा विकृती वाढत आहेत. शिक्षण शहरात चांगले असते असे म्हटले जाते, मग याच शिक्षणात या समस्या कमी होतील यावर काही उपाय सापडत नाही.
वरील समस्या आज तथाकथित मुख्य प्रवाहाचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. याच प्रवाहात न्याय या गोष्टीला पैशात तोलले जात आहे. समाधान ही बाब या प्रवाहातुन अगदी संपुष्टात आलेली आहे.
आता विचार करा मित्रांनो, स्वताच्या पदरात काही नाही पडले तरी चालेल परंतु आपला शेजारी, आपले कुटुंब, आपला गाव, आपला समाज सुखात असला पाहिजे ही आदिवासी संस्कृती. निसर्गाला आपला पाठीराखा मानून त्याचे जतन आणि संवर्धन हेच संस्कार....खिशात रुपया नसला तरी काही फिकिर नाही...खरे तर खिसा असतोच कुठे हां मोठा प्रश्न...वस्तू विनिमय आणि मदतीची भावना यामुळे पैशाची गरजच नसते. दोन घास आपल्या पोटात गेल्यावर घरातील कुत्रे, मांजरे, गाई, जनावरे, पक्षी यांचाही विचार आमचे आदिवासी बांधव करतात. आम्ही यालाच देव मानले आहे.
जगण्याचे दोन्ही प्रवाह आपल्या समोर आहेत. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणायचे म्हणजे नक्की काय तर त्यांना अनंत समस्यान्च्या गराड्यात सोडून द्यायचे सडत-कुढ़त मर मर जगण्यासाठी....काही लागले असतीलही नोकरीला....परंतु संस्कृतीविना त्यांचे समाजमुल्य तरी काय? काडी मात्र किंमत नसणारे जीवन जिथे नशिबात येणार असा मुख्य प्रवाह जाणिवपूर्वक तर चर्चेत आणुन राबविला जात नसेल ना असाही विचार करण्याची गरज आज आदिवासी बांधवांसमोर आहे.
मुख्य प्रवाहातील समस्या सोडवयाच्या असतील तर त्याला एक प्रभावी मार्ग आहे आणि तो म्हणजे आदिवासी संस्कृती...परंतु असे असताना आदिवासी वनसंपत्ती, जमीन, जल यावर डोळा ठेवून असणारे कारखानदार आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा कट करून आदिवासीला मारण्याचा खुलेआम प्रयत्न करत आहेत.
जगात प्रगतीबरोबर शांतीच्या मार्गाने समाधानाचे जीवन जगायचे असेल तर आदिवासी संस्कृतीचा मार्ग मुख्य प्रवाहातील लोकांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.
- Raju Thokal
=============================================================================
0 comments:
Post a Comment